वैयर्थ जेथे उमगे सदा…

ताज्या

थाऱ्यावर मोर

मोराला असतात ना डोळ्यांची पिसं, तशी एकसारखी गोलगोल चेहरे डोक्याला लगडलेली असतात…

नगाने मान्य केलेल्या शक्यतांंना घेऊन जगत असतांना उडत्या चेहऱ्यांचा पुंजका आपल्या डोक्यावर ऊंडारत असतो, तेव्हा त्यातले विनाअर्थ आपली नातलग-मित्रमंडळी आणि अपरिचितजणांची एकत्रपणे एकच एक मिसळ होऊन जात असते. त्यांची मांदियाळी परत परत स्वप्नात आपल्या आपला तोच पिच्छा पुरवत असते. करावे काय त्यांचे?

आपल्या सोबत वंश नावाच्या आदिम जाणीवेतून नातलगमंडळी जोडलेली असतात, तर या जन्माला पुरवतील इतके अनुभव द्यायला मित्रमंडळी सोबत जुळलेली असतात.हे सर्वजण आपल्याला सुटे करता येतात पण अर्थबोध न होणारे अपरिचित चेहऱ्यांचे काय?

अर्थ नसलेले श्वास येतात उश्वास निघतात आपल्या प्रत्येकाच्या नशीबी, रंग-रूप-रस-स्पर्श-गंध यांचेपण विनाकारण आदान-प्रदान आपल्याच्याने होत असते, डावे-उजवे झुलत असते मनावर, ताबारहित जिणे असते, तेव्हा, तेव्हाचेच ही चेहरे डोक्यात चिकटून जात असतील घट्ट आणि आपणमात्र संदर्भहीन त्यांची आकार-ऊकार शोधत असतो.

आणि का होईना मागचे पुढचे चेहरे डोके नावाच्या डब्यात आपल्याला फसवून ठेवता येतातच, तल्लीन व्हायला तेवढंच एक कारण होते. त्याचे झाकण किलकिले करणे मात्र आपल्या हाती नसते.