दिवसांचे मळभ

बरेच दिवसात इथे आलो नाही आणि लिहिले नाही.. मनातली संभ्रमावस्था मांडण्याची मी इथे केलेली सुरुवात आता डळमळीत होत आहे, पण असू दे, त्यातून मला एकाच वेळी बरंच लिहिण्यासाठी बळ मिळतं. आजचं हे लिहिणे असेच काहीसे.. मला सतावणारे प्रश्नं असेच एकत्र जमून माझ्या मनात गोंधळ उडवतात. मला माझा क्रोध कधी आवरता येत नाही. हातून घडलेली गोष्ट आपण मोडून टाकू शकतो, पण तोंडाने बोललेली गोष्ट कधीसुद्धा कुणाच्या मनातून काढता येऊ शकत नाही.. माझ्याही मनात याच रितीने इतरांमुळे साचलेले बोल सारखे आठवू लागतात, आणि मला जगणे अनावर होऊन जाते. दिवसा जागत्या क्षणी होणारी ही सूक्ष्म वादळे रात्रीच्या झोपेच्या क्षणी शमू लागतात. म्हणून मग दिवसा मळभ दाटून राहते.. आताशा हे पावसाचे दिवस आले आहेत, त्याचेही प्रत्यक्ष मळभ दिसू लागले आहेत..मग काय माझ्या मनाची अवस्था विचारू नये, अशी झालीय.. माझ्या क्रोधासंदर्भात माझ्या मनात आक्रमक असे रण-क्रंदन उभे राहत असते..जो माझ्या विरुद्ध असेल, त्याचे धिंडवडे करण्यात मी कचरत नाही. त्या रागाच्या आवेगानंतर मलाच खुपत राहते मी काय करून चुकलो ते.. ते क्रोधाच्या अग्नीने व्यापलेले मळभ मला एकदा दूर सारायचे आहे..आणि अश्रुरूपी पावसाने मला सारे गैरसमज खोडायचे आहे…

यावर आपले मत नोंदवा