द्वैत

मध्वांनी ‘द्वैत’ याच कर्नाटकभूमीत सांगितले.

आपल्या नित्याचे असते, वेगळेपण जाणून राहणे, वागणे.

प्रवाहातून निवडून काढणे, ठळकपणे काहीएक जपणे.

द्वैत हा sophistication चा परमोच्च बिंदू आहे.

द्वैत कधी प्रतिबिंब मागत नाही, त्याची छायासुद्धा नाकारतो.

कुणालाही परावलंबी बनवत नाही.

प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व असतं.

पापणीतून ओघळून आलेला अश्रू वेगळा आणि चुकून बोटावर आलेली लव वेगळी.

एकाच रागातला एक सूर दोन वेगवेगळ्या पदांमध्ये वेगवेगळाच.

कसलीच जोडसाखळी नसलेली ही अनोखी सृष्टीरचना.

नाही पार्श्वभूमीवर तिला कसला भक्कम आधार, की पुढे वाढून ठेवलेला नियतीचा तर्कसुसंगत निर्णय.

अस्तित्वांना छेदणारा एकच एक बाण नाही.

त्यांना जन्म देणारा एकच एक नियंता नाही.

जराजर्जर झालेल्यांना एकच एक यम नियम नाही.

सर्व कसं सर्वदूर विखुरलेले आहे.

कुणी एकाने आवरायला घेतलेले नाही‌.

कोपर्‍यात कोनाड्यात कुठे नवा जन्म, नवा उन्मेष उत्पन्न होत आहे. विश्व स्तरावर काही एकच सामायिक असं काही घडतच नाही.

प्रत्येकासाठी धावणारा श्वास हा वेगळा, त्याच्या उच्छ्वासाचे मार्गही निराळे.. केवळ एकच एक सोय म्हणून, त्यांना सामायिक व्याख्यांत बसून ठेवलेले आहे.

‘श्वास सारेच घेतात’ असं काही! पण, नाही, श्वासाची ही फुटकळ व्याख्या, तिच्या विशिष्ट अस्तित्वाला, ‘द्वैता’च्या फारकतीला अमान्य करू शकत नाही.

किती काळाचा प्रवास, आपापल्या पद्धतीने असणारा विशिष्ट, त्यानंतर आलेला तो श्वास, कोणाचा उत्सव, तर कोणाचा अखेरचा श्वास..ही विशेषणे तर ‘बेगडी सामायिक व्याख्या’ आहेत खरं तर. त्या विशेषणांना ‘द्वैता’ चा जरासा पण निष्फळ असा स्पर्श देऊन परत समान पातळीवर आणण्याची आळशी सोय करून ठेवावी!

८.१०.२०२२

यावर आपले मत नोंदवा